ताज्या बातम्या

“तुझा सूर की अर्णव अमृताचा”लता दीदी यांच्या जन्मदिना निमित्त प्रकाशित..


लोकार्थ/सप्टेंबर २८, २०२२

पितृछाया हरपली. लक्ष्मीची पाठ फिरली. कुटुंबाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. कुटुंबियांना काही कमी पडू नये म्हणून पोर वयातच काम सुरू करावं लागलं.

मुंबई उपनगरातील मालाड रेल्वे स्टेशन पासून दूर असलेल्या कामाच्या ठिकाणी टांग्यानं न जाता स्वत:च्या टांगांनी जाऊन, त्या वाचलेल्या पैशातून ही मुलगी भाजी घेत असे. चरितार्थासाठी पै पै वाचवणारी, बहुतेक, मूळ हेमा हर्डीकर(मूळ हर्डीकर हे आडनाव पुढे कधीतरी रूढ आडनावात परिवर्तित झाले असं माझ्या वाचनात आलं. या संदर्भात कुणाला अधिक माहिती असल्यास कृपया द्यावी) ही पोरसवदा मुलगी आपल्या स्वर हेमानी अवघी चराचर सृष्टी अभिषिक्त करेल, अशी कल्पना स्वप्नात देखील कुणी केली नसेल. पण हे वास्तव ठरलं.

साक्षात सरस्वतीनं या मुलीचा कंठात वास करून स्वरालाप केला. स्वरलक्ष्मी प्रसन्न होतीच नंतर धनलक्ष्मीही कृपावंत झाली. वसुधातली स्वरमौक्तिकांची असीम दौलत उधळून देणारी ही दैवगुणी मुलगी या लोकी लता मंगेशकर म्हणून ओळखली गेली. नामा आधी आणि नंतर लागणारी विशेषणं, पदव्या, पुरस्कार जितके अधिक, तितकी ती व्यक्ती मोठी अशी एक सर्वसाधारण मान्यता आहे. मात्र क्वचित एखादं व्यक्तिमत्त्व स्वनामधन्य असतं. उपाध्या, विशेषणं, पदव्या, पुरस्कार अश्या व्यक्तींच्या बाबतीत गौण ठरतात. त्यांचं व्यक्तिमत्वच मुळी सर्वोच्च पुरस्कार रूप धारण करतं. अश्या विभुतींचा सत्कार कसा करणार? त्यांची पूजा बांधली जाते. लता हे नामाभिधान असच आहे. अगदी एकेरी उल्लेख झाला तरी बहुमान किंचितही कमी होत नाही. कुठल्याही पुरस्कारामुळे त्या नाही, तर त्यांच्यामुळे पुरस्कार धन्य झाले असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरत नाही.

स्वराधीश मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना ज्योतिष विद्याही अवगत होती. लताची नाममुद्रा जागतिक पटलावर उठेल, मात्र तिची दिगंत कीर्ती याची देही याची डोळा आपणाला पाहता येणार नाही हे ते जाणून होते. त्यांनी आपल्या लेकीला हे सांगितलं होतं. आपल्या कन्येचे दैवी गुण तिच्या जन्मा आधी पासूनच उमजले होते. कदाचित म्हणूनच लता अवघ्या चार पांच वर्षांची असतांनाच त्यांनी तिची सांगितिक शिकवणी पूरिया धनाश्रीनी सुरू केली. साधारणतः या रागानी कुणीही कुणाची तालीम सुरू केल्याचं ऐकिवात नाही.

मा. दीनानाथ यांच्या पश्चात, अमान अली यांच्याकडे हंसध्वनी पासून प्रारंभित झालेली लताची तालीम अमानत अली यांच्या पर्यंत येऊन, पार्श्व गायनातल्या व्यस्ततेमुळे, विराम करती झाली. शास्त्रीय संगीतासाठी म्हणावा तसा वेळ देता न आल्याची खंत मात्र दीदींना अखेर पर्यंत होती. मात्र कुमार गंधर्वां सारख्या शास्त्रीय संगीतकारानी म्हटल्या प्रमाणे ‘लताजींच्या तीन मिनिटांच्या गाण्यातून ही तीन तासाच्या मैफिलीचा परिपूर्ण अनुभव येतो’.

भारतीय स्वातंत्र्य सूर्याच्या उदयाच्या साक्षीनं लताच्या पार्श्वगायन कारकीर्दीचा अरुणोदय झाला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा बरोबरच लताच्या कारकिर्दीचा ही अमृत महोत्सव असा सुवर्ण योग साधला गेला आहे. लताचा प्रारंभीचा जीवन संघर्ष हळूहळू तीव्र सप्तकातून मंद्र सप्तकाकडे उतरू लागला आणि पुढील वर्षभरातच आपल्या मधुरीम, सुरेल शैलीत निर्धार पूर्वक लतानी जगाला ठामपणे सांगितलं

…आएगाss,आएगाsss,आएगा आएगा आनेवाला आएगा……..आणि स्वर शिखराच्या ध्रुवपदी त्या चिरंतन आरूढ झाल्या.

आपला आवाज अमर झाला अशी धारणा मात्र त्यांनी कधीच बाळगली नाही. इतरांपेक्षा आपणाला काम, नाम आणि नंतर दाम ही अधिक मिळाल्याचं त्या विनम्रपणे विषद करत. सफलतेच्या सर्वोच्च पदावर आरूढ असतांनाही आपण सर्वज्ञ झालो, आपण सर्व काही प्राप्त केलं अशी भावना कधीही कुणीही करून घेऊ नये, कारण संगीत हा असा कला प्रांत आहे की ज्यात कुणीही परिपूर्णता प्राप्त करु शकत नाही, असं त्या अत्यंत शालीनतेनं म्हणत.

आत्यंतिक गरजवंत असताना ऐन उमेदीच्या काळात संगीतकार अनिल विस्वास यांनी लताला एक गाणं दिलं होतं. त्या चित्रपटात नायकाची भूमिका करणाऱ्या दिलीप कुमारशी लोकल प्रवासा दरम्यान, अनिलदा यांनी जेव्हा नवख्या लताची ओळख करून देताना सांगितलं की ही नवीन मुलगी आहे, चांगलं गाते, तेव्हा दिलीप कुमार यांनी मंगेशकर हे आडनाव ऐकल्याबरोबर “अरे ये तो मराठी हैं l मराठी लोगों के तलफ्फुज मे थोडी दाल चावल की बू आती है” अशी टिप्पणी केली. स्वाभाविकपणे राग आला, तरी जराही हतोत्साही न होता लतानी तत्काळ उर्दू शिकायला प्रारंभ केला आणि गरम गरम वरण भात आणि वर तुपाची धार या अस्सल मराठी खुशबू ची अवघ्या जगाला प्रचिती दिली. दिलीप कुमार यांच्या टिप्पणी मुळे उर्दू शिकून उच्चार सुधारण्याची संधी मिळाली म्हणून त्यांना धन्यवाद ही दिले.

यशाचा मार्ग हा न जवळचा न सोपा. यशोशिखरावर आरूढ होणारी व्यक्ती ही नेहमीच कठोर प्रयत्न आणि खडतर वाट पार करून तिथे पोहोचत असते. युग सम्राज्ञी लता दीदी याच उत्तम उदाहरण ठरल्या. कुठलही गाणं ध्वनिमुद्रित करण्याआधी त्या गाण्यावर अतोनात मेहेनत घेत. एकतर प्रत्येक गाणं स्वहस्तात लिहून घेत. ते गाणं कोणावर चित्रित होणार, कसं चित्रित होणार हे पण दिग्दर्शकाला विचारून घेत. शब्दार्थांच्या छटा समजवून घेत आणि असा सगळा गृहपाठ करून झाल्या नंतरच ध्वनिमुद्रणाला होकार देत. उगाच नाही त्यांची गाणी थेट काळजात घर करतात. दीदी आणि त्यांच्या गाण्यांचं वर्णन करण्या साठी शब्दसंपदा कायमच अपुरी वाटते. आपलं आकलन, प्रतिभा, भाषा, कल्पनाविष्कार याचं तोकडेपण कण सूरा प्रमाणे सतत टोचत राहतं.

लता दीदींचा गळा जितका वळणदार तितकाच स्वभाव सरळ. ख्याती प्राप्ती नंतरही त्यात बदल झाला नाही. कुणाशीही त्यांचा सहज संवाद होत असे. ह्याचा अनुभव मी स्वतः ही घेतला आहे. गाणं निवडी बाबत त्या अत्यंत चिकित्सक होत्या. गीतकार गुलजार यांचं, पंचमची संगीत रचना असलेलं ‘आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज हैं’, हे नर्म श्रृंगार प्रधान अवखळ गीत सर्वांना चांगलच परिचयाचं आहे. या गीताच्या अंतऱ्यात असलेल्या ‘बदमाश’ या शब्दाला दीदी आक्षेप घेतील अशी पंचम(R D Barman) ची अटकळ होती. त्यामुळे तो बदलण्यासाठी त्यांनी गुलजारच्या मागे लकडा लावला होता. गुलजार पर्यायी शब्द तयार ठेवायला अनुकूल होते मात्र शब्द बदलण्यापूर्वी एकदा दीदींशी चर्चा करण्याचे पक्षधर होते. लता दीदींना जेव्हा गाणं दाखवलं तेव्हा त्यांनी कुठलाही आक्षेप तर घेतला नाहीच उलट मला गायला एक नवा शब्द मिळाला असं म्हणत रेकॉर्डिंगच्या वेळेस तो किंचित हास्य मिश्रित गाऊन अधिक बहार आणली.

लता दीदींच्या पार्श्वगायनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नायिकेला आपलं गाणं दिलं, आवाज दिला नाही. तिची गाणी सर्वकालिक नट्यांवर जरी चपखल बसली, तरी रफी जसा देवानंदचा, शम्मीचा आवाज झाला तसा लताचा आवाज कधी शर्मिला, साधना, नूतन, माधुरीचा झाला नाही, तो तिचाच राहिला.

प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका परवीन सुलताना म्हणतात त्याप्रमाणे लता दीदी दैवी देणगी घेऊन जन्माला आल्या पण तिचा कसा सांभाळ करायचा आणि ती इतरांसमोर सादर करताना स्वर्गीय आनंद कसा निर्माण करायचा हे तंत्र त्यांनी स्वतः घडवलं. साथीच्या वाद्यां बरोबर आपल्या आवाजाचा मेळ राखणं, स्वरांच वजन तोलण, लांबी रुंदी राखणं, श्वासाच तंत्र हे सर्व विणकाम लताजी स्वतःच्या पद्धतीने करायच्या. अव्यक्ताला व्यक्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या स्वरात होतं.

सर्वोच्चपदी पोहोचण्या पेक्षाही त्या स्थानी कायम राहणं हे अधिक दुष्कर आहे. नंबर एक वर असण्याचे फायदे तर आपण सर्वच जाणतो पण त्याचे तोटे, मनावर सतत असणारं दडपण सर्व सामान्यांना जाणवत नाही. पार्श्वगायन क्षेत्रात शीर्षस्थ असण्याऱ्या लता दीदींना आपलं काम, गायन या बाबत कधीच संतुष्टता येत नाही. ज्यांची गाणी ऐकून लोक असीम शांतता, निवांतता अनुभवतात, त्या दीदी मात्र स्वतःची गाणी कधीच ऐकत नाही. काय माहित कसं गायलं गेलं आहे? अश्या प्रकारची भीती त्यांच्या मनात असते असं त्या सांगतात. हा काही आत्मविश्वासाचा अभाव नाही तर परिपूर्णतावादी स्व-भाव आहे. प्रमाण आहे !

तार सप्तकात स्वराविष्कारच्या वेळी तीव्र स्वरपंक्ती गातांनाही त्यांच्या चेहऱ्याच्या रेषा अस्पष्ट ही बदलत नसत. हे अशक्यंभवी आहे. मात्र अशा जागा गातांना त्या आपल्या पायाच्या अंगठयावर सर्व ताण देत हे शक्य करीत असत. पायताण उतरवून गाण्याच्या त्यांच्या सवयी मुळे हे उलगडून आलं.

सुरमयी लता मंगेशकर यांचं जीवन गाणे अनेक असूर, कणसूर, बेसूर, बदसूरांनी व्यापलं होतं. त्यांच्या आणि आशा भोसले यांच्या संबंधांबद्दल नाना तऱ्हेच्या कंड्या पिकवल्या गेल्या. काही काळ त्या दोघीं मध्ये अबोला होता ही बाब सत्य आहे मात्र त्याला कारणीभूत होते, आशा यांचे पती गणपतराव भोसले. आशा ताईंनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कुणालाही न सांगता घरून पळून जाऊन हा विवाह केला होता.

सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांची स्वरयात्रा अवरोहित करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला. लता दीदींनी तो स्पष्टपणे खोटा असल्याचं सांगितलं होतं. सुमन कल्याणपूर यांना आपलं स्वतःच रिहल्स केलेलं गीतं दिल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. वाणी जयराम यांच्या उमेदवारीच्या काळात त्यांची सर्वप्रथम प्रशंसा केल्याचंही त्या नमूद करतात. त्यांच्यावर विषप्रयोग ही झाला होता.

‘किंचित’ लता मंगेशकर होऊ शकण्याची शक्यता स्वप्नात जरी निर्माण झाली तर कुणालाही धन्य धन्य वाटेल. मात्र स्वतः लता मंगेशकर यांची इच्छा ऐकली तर त्यावर विश्र्वासच बसणार नाही. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की हिंदू पुनर्जन्म मानतात. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की मला मात्र पुनर्जन्म नको आणि जर का मिळालाच तर तो भारतातच, महाराष्ट्रात एखाद्या सामान्य छोट्या कुटुंबातल्या मुलाचा मिळो. लता मंगेशकरचा नको.

लौकिक देह धारण केल्यावर शरीर व्याधींचा फेऱ्यातून अवतारांची ही सुटका होत नाही. या नियमानेच की काय, कोकीळ कंठानं स्वरांची पखरण करण्यासाठी शरीर धारण केल्यामुळे मर्त्यलोकीचे आपले अखेरचे 27 दिवस ह्या गान देवतेला रुग्णालयात काढावे लागले. मानसीच्या सुरेल स्वरांना, अतिदक्षता विभागा मध्ये(ICU) कानावर सतत पडणारे व्हेंटिलेटर चे बिप बिप हे तांत्रिक असूर ध्वनी मैफिलीची भैरवी जेव्हा बेसूरी करू लागले तेव्हा अखेरच्या दोन दिवसात त्यांनी हेडफोन्स ची मागणी केली आणि आपल्या पित्याचे तेजस्वी सूर कानात साठवत आणि आळवत त्या या भूलोकातून गंधर्वलोकी प्रयाण करत्या झाल्या.

लता दीदी आपल्यातून जरी शरीरानं निघून गेल्या असल्या तरी सूर रूपानं त्या आपल्या कानी, मनी, ध्यानी नित्य वास करणार आहेत. हृदयात निरंतन चिरंजीव राहणार आहेत तेव्हा त्यांच्या जाण्याचा शोक का करावा? देवर्षी नारदांनी कलियुगाच्या प्रारंभी, साधनेचा सोपा मार्ग भगवान विष्णू यांना विचारला. जेणेकरून जनसामान्यांना परमात्म्याचा सहज साक्षात्कार होण्यास मदत होईल. त्यावेळी नारदांचे शंकांनिरसन करतांना भगवान विष्णू म्हणतात,

|| नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये न च|

मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद||

मी वैकुंठात राहत नाही, योगिजनांच्या हृदयातही मी निवास करीत नाही. माझे भक्तजन जिथे संकीर्तन, गायन, वादन करतात तिथे मी वास करतो. दीदींची परमेश्वरावर अपार श्रध्दा होती. त्यांच्या गायनाच्या श्रवणामुळे इहलोकी ही साक्षात श्री विष्णूंच्या सानिध्याचा आपणाला लाभ होतो आहे हे विशेष.

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851540881

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button