राज्यराजकीय

फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ मध्ये ‘पंकजा मुंडे’ ; नवभाजपला झाली ताईंची आठवण!

टीम द – लोकार्थ | पुणे – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी सर्वप्रथम राज्यात सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग केला होता.माळी,धनगर आणि वंजारी अशा बहुजन समाज वर्गाला राजकीय पटलावर एकत्र आणण्याची किमया यातून त्यांनी साध्य केली होती.बघता बघता उच्चवर्नियांचा भाजप तळागाळातील माणसांचा पक्ष म्हणून रुजला गेला.स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरच्या काळात बाळसे धरलेल्या नवभाजपाने मध्यंतरी सोशल इंजिनियरिंगची गरज नाही हा अविर्भाव दाखवला,अर्थात कालांतराने त्याचे दुष्परिणाम दिसून आले.

तीन दशकांपासूनच्या सोशल इंजिनियरिंगची भाजपला पुन्हा आठवण झाली,याचे निमित्त होते ‘मी पुन्हा येईन’ या व्हिडिओतील पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्याची.काल भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ चा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल,असे व्हिडिओचे टायटल होते.मात्र,काही वेळानंतर हा व्हिडिओ ट्विटर वरून हटवण्यात आला.या व्हिडिओ पोस्टवर मोठया प्रमाणात नकारात्मक कमेंट्स देखील करण्यात आल्या होत्या.या व्हिडिओची राजकिय वर्तुळात एकच चर्चा होताच तात्काळ हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला.

या व्हिडिओ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा केलेला समावेश प्रकर्षांने जाणवला.याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाली.गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून अडगळीत पडलेल्या पंकजांची राज्य भाजपला आगामी निवडणुकीच्या तोंडावर आठवण झाली आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपने सत्ता मिळवली खरी पण, त्यांच्या पुढे असणाऱ्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत.अपात्र आमदारांच्या सुनावणीचा निकाल,मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पेटलेला प्रश्न यामुळे भाजप सध्या बॅकफूटवर आहे.सकल मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप विरोधात जावू लागला आहे.तर दुसरीकडे भाजपचा पारंपारिक मतदार असलेला ओबीसी समाज देखील भाजपवर नाराज असून असुरक्षितेची भावना व्यक्त करत आहे.

याच दरम्यान 2014 आणि 2019 साली कुठलेही पक्ष न फोडता असलेली भाजपची ताकत पुन्हा प्राप्त करण्याचे धोरण डोळ्यासमोर ठेवून,ओबीसी समाजाची राजकीय व्होटबॅक मजबूत करून सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ओबीसी समाजातील नेतृत्वाची पोकळी भरून काढून भाजप स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे बोलले जात आहे.शिवशक्ती यात्रा आणि दसऱ्या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी आपली ताकद पक्षाला दाखूवन दिली आहे.आपल्याकडे कोणतेही पद नसले तरी आपल्यासोबत समस्त बहुजन,ओबीसी समाज असल्याचे पंकजांनी पक्षाला ठणकावून सांगितले आहे.त्यामुळे,आगामी काळात राजाच्या राजकीय वर्तुळात कोणकोणते बदल पाहायला मिळणार? हा येणारा काळच ठरवणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button