ताज्या बातम्याराज्य

भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग,पंकजा मुंडेंचे होणार हेलिकॉप्टरने आगमन !

टीम द – लोकार्थ | पाटोदा – राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो,यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

येत्या २४ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने ‘आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे.मागील पाच ते सहा वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला ‘भगवान भक्तीगड’ असे नांव दिलेले आहे.

भगवान भक्तीगडावरील १८ एकर परिसरात हा मेळावा होणार असून डागडूजी,परिसराची स्वच्छता आणि इतर कामांनी वेग घेतला आहे.पंकजा मुंडे यांच्या स्वागताची देखील ग्रामस्थांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गुढी उभारून यंदा त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.

हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात. संत भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजा मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो.प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टरने सावरगांवला आगमन होणार आहे.संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन त्या मेळाव्यास संबोधित करतील.

पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

पंकजा मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता व राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता पंकजाताई मुंडे काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. त्यांचे लाखो समर्थक त्यांना ऐकण्यासाठी भगवान भक्ती गडावर मोठ्या संख्येने दाखल होण्याची
शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला असून नुकतीच पोलीस अधिकाऱ्यांनी दसरा मैदानाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button