ताज्या बातम्या

संपूर्ण देशात 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, ज्यांना निमंत्रण त्यांनीच सोहळ्याला या, पंतप्रधान मोदींचे राममभक्तांना आवाहन..

संपूर्ण देशात 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, ज्यांना निमंत्रण त्यांनीच सोहळ्याला या, पंतप्रधान मोदींचे राममभक्तांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
By: लोकार्थ टीम.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी 30 डिसेंबर रोजी अयोध्येतील महर्षि वाल्मिकी विमानतळ, रेल्वे स्थानक आणि इतर अनेक विकास कामांचे उद्घाटन केले. तसेच यावेळी त्यांनी 22 जानेवारी रोजी लोकांना अयोध्येत न येण्याचं देखील आवाहन केलं आहे. यावर त्यांनी म्हटलं की, तुम्ही मागील 550 वर्ष वाट पाहिली आता आणखी थोडा वेळ वाट पाहा.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 22 जानेवारीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी स्वतः अयोध्येत येण्याची इच्छा प्रत्येकाला आहे. परंतु प्रत्येकाला येणे शक्य नाही. त्यामुळे माझी सर्व राम भक्तांना विनंती आहे की, 22 जानेवारीला औपचारिक कार्यक्रम झाल्यावर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार अयोध्येत यावे.

ज्यांना निमंत्रण आहे त्यांनीच फक्त अयोध्येत यावं
या भव्य सोहळ्याची तयारी वर्षानुवर्षे सुरू असून त्यात कोणताही व्यत्यय येऊ नये. येथे गर्दी करू नका, कारण मंदिर कुठेही जात नाही. हे शतकानुशतके टिकेल. या सोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना आमंत्रण देण्यात आले आहे त्यांनी फक्त अयोध्येत यावं, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

‘घरोघरी श्री राम ज्योती पेटवा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

अयोध्या नगरी स्वच्छ करण्याचं आवाहन
यावेळी पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील जनतेला शहर स्वच्छ करण्याचे आवाहन केले. अयोध्या आता लाखो पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असली पाहिजे. अनंतकाळपर्यंत पर्यटक येथे येतच राहतील. अयोध्येला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्याची शपथ अयोध्येतील जनतेला घ्यावी लागेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरकार अयोध्येला स्मार्ट बनवणार
अयोध्येमधील विविध विकास कामांचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी लोकार्पण केले. यावेळी त्यांनी म्हटलं की, आज मला अयोध्या धाम विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मिळालं आहे. मला आनंद होतोय की अयोध्या विमानतळाचं नाव हे महर्षि वाल्मिकी यांच्यावरुन ठेवण्यात आले.
येथे श्री रामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर येथे येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. हे लक्षात घेऊन आमचे सरकार अयोध्येत हजारो कोटी रुपयांची विकासकामे करत आहे आणि अयोध्येला स्मार्ट बनवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button